मी आगरकरांचे चरित्र लिहावे आणि ते लिहून झाल्यानंतर प्रा० श्री० पु० भागवत यांनी मौज प्रकाशन गृहातर्फे ते छापावे अशी जाहीर सूचना प्रा० न० २० फाटक यांनी १८ मे १९७० रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने त्यांच्या ‘आदर्श भारतसेवक’ या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले त्यानिमित्त झालेल्या सत्कार-समारभात केली होती. त्यांच्या संग्रहातील आगरकरांचा खासगी पत्रव्यवहार तसेच काही दुर्मीळ ग्रंथ त्यांनी मला दिलेच, शिवाय चरित्रलेखनाची पूर्वतयारी करताना जे संशोधन करणे आवश्यक होते त्याबद्दलही मार्गदर्शन केले. टिळक, गोखले व आगरकर यांच्यामधील परस्परसंबंधांविषयीची त्यांची व माझी मते भिन्न असल्याचे त्यांच्याबरोबर चर्चा करताना वेळोवेळी स्पष्ट झाले होते. तरीही आज पंचवीस वर्षांनंतर का होईना, प्रा० फाटक यांना दिलेला शब्द आम्हां दोघांना मी आणि प्रा० श्री० पु० भागवत यांना-पाळता आला याचे समाधान वाटते. आगरकरांचे चरित्र तुम्ही लिहून पूर्ण कराल आणि प्रा० श्री० पु० भागवत ते प्रकाशित करतील तेव्हा आपण हे जग सोडून गेलेले असू, असेही ते चारपाच वेळा मला म्हणाले होते. तरीही घाईघाईने केवळ उपलब्ध प्रकाशित साधनांच्या आधारे मी हे चरित्र लिहू नये, असे ते बजावीत असत. आजवरच्या टिळकांच्या आणि आगरकरांच्या चरित्रकारांना जी अस्सल साधने उपलब्ध झाली नव्हती ती मी धुंडाळावीत आणि ज्ञात तसेच अज्ञात प्रकाशित व अप्रकाशित साधनांचा वापर करून आगरकरांचे चरित्र लिहावे असा त्यांचा आग्रह होता. या चरित्रलेखनाच्या पूर्वतयारीचे फलित म्हणजे ‘शोध बाळ-गोपाळांचा’ हा १९७७ साली प्रकाशित झालेला लेखसंग्रह. तो मी प्रा० न० २० फाटक यांना अर्पण केला तोही त्यांच्याविषयी मला वाटणाऱ्या कृतज्ञ्चतेपोटी. गेली पंचवीस वर्षे अधूनमधून मला आठवण करून देऊन प्रा० श्री० पु० भागवत यांनी या संकल्पाचा चिकाटीने पाठपुरावा केला म्हणून चरित्रलेखनाचा हा सकल्प सिद्धीस जात आहे. माझ्याकडून या बाबतीत झालेल्या अक्षम्य विलंबाकडे प्रा० भागवतांनी दुर्लक्ष केले. लेखक म्हणून माझ्यावर असलेले त्यांचे ऋण फिटण्यासारखे नाही.
• य दि फडके, पुस्तकातून.