पं. सत्यशील देशपांडे हे नाव संपूर्ण भारताला शास्त्रीय संगीतज्ञ, गायक, रचनाकार आणि लेखक – समीक्षक म्हणून परिचित आहे. ते कुमार गंधर्वांचे शिष्य आहेत, त्यांची गायकी त्यांनी समर्थपणे पुढे नेली आहे पण इतकीच त्यांची ओळख नाही. भारतभरातल्या सगळ्या घराण्यांची गायकी तसे स्वतंत्र कलाकारांची गायकी त्यांच्या त्यांच्या सांगीतिक विचारांसह ध्वनिमुद्रित करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी संवाद फाउंडेशनतर्फे सुरू केलं जे आजही सुरू आहे.
हे पुस्तक दोन भागात विभगलेलं आहे. पहिल्या भागात लेखकाचं बालपण आणि शिक्षण असा चारित्रात्मक भाग आणि पं. भीमसेन जोशी, देवधर, रेळेकर, पु. ल. देशपांडे इत्यादि अनेक समकालीन लोकांची व्यक्तिचित्रणं आहेत. दुसऱ्या भागात लेखकाने शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतावर समीक्षा तसेच आस्वादात्मक पद्धतीने लिहिलेले लेख आहेत. यात बंदिश आणि ख्यालविमर्श तसे शास्त्रीय संगीताची सद्यस्थिती अशा विषयांचा समावेश आहे.
कुठल्याही एका प्रकारात टाकता येईल अशा धाटणीचं हे पुस्तक नाही. एकाच व्यक्तीने संगीत आणि आपलं आयुष्य मध्यस्थानी ठेवून लिहिलेल्या लेखांचा संग्रह अशीच त्याची रचना म्हणता येईल. संगीत क्षेत्रात पं सत्यशील देशपांडे या नावाभोवती असणारं गूढ वलय या पुस्तकाच्या वाचनाने काही प्रमाणात कमी होतं हे मान्य करताना ते अजून थोडं वाढतंदेखील हे सुद्धा मान्य करावं लागतं.
गान गुणगान | लेखक: सत्यशील देशपांडे