‘….रशियन नाट्यकर्मी स्टॅनिस्लॅव्हॅस्कीच ‘नेव्हर लूज युअर सल्फ ५ स्टेज’ हे महत्त्वाचं तत्त्व न्यायालयात वकिलाला आणि न्यायाधीशाला चांगलंच लक्षात ठेवावं लागतं. ‘जग ही रंगभूमी आहे’ या शेक्सपिअरच्या वचनाचा प्रत्यय या व्यवसायात पदोपदी येतो. तेव्हा या रंगभूमीवरच्या वेगवेगळ्या भूमिका जवळून पाहताना, किंबहुना त्याचा एक भाग असताना त्यातल्या घटना, त्यातली पात्रं, हेवेदावे, भावनाविष्कार या सर्वांचे वेळोवेळी काढलेले
क्लिक्स मनात कुठेकुठे दडून बसलेले आहेत. प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाने अ असतात. कोर्टकचेरी, न्यायप्रक्रिया, साक्षीदार, पक्षकार, वकील हा सगळा ११ वर्षांच्या वकिलीचा आणि २६ वर्षांच्या न्यायदानाचा प्रवास मला इतर वेळी सतत सोबतीस होताच आणि असतोच! त्या प्रवासाची खूप ‘क्लिक्स’ माझ्याकडे साठवलेली आहेत. ती दाखवावीशी वाटली, म्हणून तुमच्याबरोबरचा हा संवाद. मी काढलेले, वेगवेगळ्या घटनांचे, माणसांचे आणि हो पारदर्शक अपारदर्शक भावनांचेही फोटो आणि त्या फोटोंचं हे प्रदर्शन !’
- मृदुला भाटकर, प्रस्तुत पुस्तकात.
कोर्टाच्या आत एक वेगळंच जग नांदत असतं. पक्षकारांचे, साक्षीदारांचे, आरोपींचे, त्यांच्या नातेवाईकांचे किती तरी नमुने आणि त्यांच्या मानसिक आंदोलनांचे कित्येक आविष्कार तिथे बघायला मिळतात. आपल्या समाजातल्या, तसंच मानवी स्वभावातल्याही काळ्या-पांढऱ्या छटांचं, त्यातल्या खाचाखोचांचं दर्शन होतं. अकरा वर्षांची वकिली आणि सव्वीस वर्षं न्यायदानाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्याकडे असं मोठं संचित जमा होणं साहजिकच. या पुस्तकातून त्यांनी हे संचित वाचकांसमोर ठेवलं आहे. या आहेत न्याय व्यवस्थेतल्या संवेदनशील ‘माणसा’ने लिहिलेल्या प्रांजळ नोंदी !