1857 च्या विद्रोहासारख्या स्वकाळातील क्रांतिकारी घटनांचे केवळ मूकदर्शी साक्षीदारच नव्हे तर समकाल आणि परिस्थिती ह्यांतून उद्भवलेल्या असह्य वेदनाभोगांचे प्रत्यक्ष वाटेकरी असणार्या मिर्झा गालिब ह्यांचे जीवनचरित्र एक करुणोदात्त महाकाव्यच आहे.
नियतीच्या क्रूर घावांनी सतत जखमी होत असतानाही हार न मानणार्या व विपरीत काल-परिस्थितीशी एकाकी झुंज देणार्या या ‘अजब आझाद मर्दाचे’ जीवन भवदुःखाच्या विकराल जात्यात अक्षरशः भरडून निघाले. मिर्झांच्या या जीवनकहाणीतील समकालाचे गुंतागुंतीचे संदर्भ आणि शून्यापासून असीम वैश्विकतेपर्यंत स्फुरण पावणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व ह्यांच्यात निहित असणार्या अंतर्गत संबंधातील ताण्याबाण्यांचा सूक्ष्मपणे शोध घेतघेत, ती कहाणी डॉ. काळे ह्यांनी शब्दबद्ध केली आहे.
गालिबच्या शेकडो पत्रांत विखुरलेले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षणीय बिंदू सांधून त्यांच्या जीवनकहाणीचा साकार केलेला हा रूपाकार म्हणजे केवळ त्यांच्या आयुष्यात घडत गेलेल्या घटनांची नोंद नव्हे तर त्या शोकात्म जीवनावरचे समग्र भाष्य आहे, जे सहृदय रसिकतेला अंतर्मुख करते. एका अद्भुत प्रतिभासंपन्न कवीच्या अंतरंगातील विरोधाभास आणि एकात्मता ह्यांचे नाट्यमय दर्शन घडविणारे, अचूक कालभान राखणारे आणि व्यक्तिविमर्शाची जोड देऊन लिहिले गेलेले गालिबचे हे विस्तृत चरित्र, त्यांच्या चाहत्यांची त्यांच्याविषयीची कल्पना केवळ परिष्कृतच करीत नाही तर दैवी प्रकोपांनी आणि असंख्य आपत्तींनी वेढलेल्या त्यांच्या वेदनागर्भ जीवनाचे व्यापक दर्शन घडवून, जीवनचिंतनाच्या नव्या दिशा उजळून टाकते.