ज्ञानदेवांचे साहित्य आस्वादताना
सत्य-शिव-सुंदराच्या प्रत्येक उपासकाला
असा अनुभव येतो की, आपण
‘कल्पद्रुमाचिये तळीं’
विसावलो आहोत.
वेदोपनिषदांपासून काव्य-नाटकांपर्यंत
संस्कृत वाङ्मयोदधीचे त्यांनी केलेले मंथन,
षड्दर्शनांचा त्यांनी घेतलेला साक्षेपी धांडोळा,
नाना लोकरीतींचे त्यांनी केलेले सूक्ष्म निरीक्षण,
मानवी भाव-भावनांचा त्यांनी घेतलेला तरल वेध,
ॠतुचक्रातून बदलणार्या सृष्टीच्या रूप-रंगाच नि
रस-गंधांचा त्यांनी सहृदयतेने घेतलेला आस्वाद
आणि आपल्या प्रगाढ प्रेमाने, परिणत प्रज्ञेने नि
परतत्वस्पर्शी प्रतिभेने त्यांनी आकळलेले विश्वरहस्य
हे सारे त्यांच्या शब्दसृष्टीतून
आपल्या अनुभवास येते.
त्यांचे बाह्य जीवन जाणण्याची साधने
आपल्या हातीं अभावानेच असली,
तरी त्यांचे आंतर जीवन जाणण्यासाठी
त्यांच्या साहित्यात विपुलसामग्री भरून राहिलेली आहे.
त्यांच्या या समृद्ध साहित्याची संहिता
तत्कालीन सामाजिक-सांस्कृृतिक पर्यावरणाच्या संदर्भात
अभ्यासण्याचा हा एक वेगळा प्रयत्न –
स्फुट स्वरूपाचा असूनही
सर्जक शोधाच्या अनेक नव्या वाटा उजळणारा.