…….
“म्हणजे याआधीही तो गायब झाला, पण कुणीही पोलिसांत तक्रार नोंदवली नाही?” मी खुंटा बळकट करणारा प्रश्न विचारला. त्यावर मिसेस कानविद्यांनी होकारार्थी मान डोलावली.
“मग याच वेळी का?”
“सोसायटीतल्या सभासदांमध्ये कुठल्यातरी तांत्रिक कारणाने वाद चालू होता. प्रकरण कॉर्पोरेशनमध्ये गेलं. कॉर्पोरेशनच्या कागदांवर सगळ्या सभासदांच्या सह्या गरजेच्या होत्या, पण नारायणस्वामीचा काहीही पत्ता नव्हता. त्याचा मोबाइलही गेले सहा महिने बंद होता. शेवटी सभासदांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास केला; पण हाती काहीही आलं नाही. आयटी हबमधल्या कंपन्यांकडे केलेल्या चौकश्यांमधूनही फारसं काही सापडलं नाही. मग पोलिसांनी न्यायालयाकडून परवानगी घेऊन नारायणस्वामीच्या फ्लॅटचं कुलूप तोडून गेले सहा महिने बंद असलेलं दार उघडलं.” मिसेस कानविंदे काही क्षण थांबल्या.
“मग?” मी न राहावून विचारलं. “फ्लॅट रिकामा होता. डेड एम्प्टी.”
धूळ आणि जळमटं वगळता नारायणस्वामीच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना काहीही सापडलं नाही. जणूकाही गायब होताना नारायणस्वामी स्वतःचं सगळं सामानसुमान घेऊनच गायब झाला होता.
नारायणस्वामीशी सोसायटीतल्या फार कुणाचा संपर्क नसला, आणि जरी कुणाचीही त्याच्या घरी फार ये-जा नसली, तरी मोलकरीण यायची. तिच्या स्टेटमेंटवरून पोलिसांना हे कळलं की, नारायणस्वामीच्या घरात एक भलामोठा पंचावन्न इंची एलईडी टीव्ही, एक आठ सीटर सोफा, एक डबल डोर फ्रीझ, दोन एसी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह आणि दोन डबल बेडसह इतर बरंच सामान होतं. पोलिसांनी फ्लॅट ओपन केला तेव्हा या सामानाचं नखही त्यांच्या दृष्टीस पडलं नाही. हे सामान हलवल्याची कोणतीही नोंद गेटवर वॉचमनपाशी नव्हती. नारायणस्वामीचं सामान हलवायला कोणताही ट्रक वा टेंपो सोसायटीत आला नव्हता असं वॉचमनने शपथेवर सांगितलं. नारायणस्वामीचंच नव्हे, गेल्या सहा- आठ महिन्यांत सोसायटीतून ना कुणाचं सामान हललं होतं, ना बाहेरून कुणाचं सामान आत आलं होतं. नारायणस्वामीच्या घरातलं सामानही जणू त्याच्यासारखंच हवेत विरून गेलं होतं.
- कानविंदे हरवले या ऋषिकेश गुप्ते यांच्या नवीन कादंबरीतून साभार..
ही कादंबरी भयकथा, गूढकथा किंवा रहस्यकथा अशा कुठल्याच एका प्रकारात बांधील न राहता फिक्शनमधले अनेक कंगोरे हाताळते. तिच्या विस्मय, धक्का, आश्चर्य आणि अनाकलनीय गोष्टी तसेच घटना यांचा पुरेपूर वापर आहे. एका पातळीवर सत्य आणि आभास यातली भरभक्कम रेषा सूक्ष्म करत पूर्णत: पुसून वाचकांना वेगळ्याच अनुभवविश्वात ही कादंबरी नेते. मराठी भाषेत कथा सांगण्याचा हा वेगळा प्रयोग आहे हे नक्की!