पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास’ ही लेखमाला समाज प्रबोधन पत्रिका या नियतकालिकामधून बत्तीस तेहतीस वर्षांपूर्वी प्रथमतः प्रसिद्ध झाली. रेगेसरांनी लेखमालेमधून ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणून समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिद्ध केले. यथावकाश आवृत्ती संपली. अलिकडे काही वर्षे ते अनुपलब्ध होते. या विषयावर रेगेसरांचे पुस्तक आहे याची माहितीदेखील आज पुष्कळांना नसेल. (यात लोकांचा काही दोष नाही, असे खुद्द रेगेच म्हणाले असते.) पुस्तकाची नवी आवृत्ती काढावी असे सुचविण्याइतकेही स्वतःच्या लेखनाच्या बाबतीत पुढाकार घेण्याचे रेग्यांच्या स्वभावात नव्हते.
पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहासची दुसरी आवृत्ती, प्राज्ञपाठशाळा- मंडळाच्या सर्व धर्म अध्ययन केंद्राच्या विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आम्हाला विशेष समाधान वाटत आहे.
प्रो. एलेस्डेअर मॅकिन्टायर (Alasdair MacIntyre ) यांच्या A Short History of Ethics (रूटलेज अँड केगन पॉल, लंडन, १९६७) या पुस्तकातील विवेचनाचा परिचय करून द्यावा या विचारातून मूळात लेखनास सुरुवात झाली. याचा निर्देश रेग्यांनी प्रस्तावनेमध्ये केला आहे. जिज्ञासू मराठीभाषिक वाचकांचे सौभाग्य असे की, मूळ पुस्तक एक निमित्त ठरले, आणि विषयाबद्दलच्या खोलवर आस्थेपोटी रेगेसरांनी एक ग्रंथच निर्मिला. ‘हे पुस्तक मूळ इंग्रजी पुस्तकाचा स्वैरपणे किंवा काटेकोरपणे केलेला अनुवाद नव्हे.’ असा खुलासा रेग्यांनी प्रस्तावनेच्या प्रारंभीच केला आहे. रेगेसर अनुवाद-स्वैर वा काटेकोर – सहजच करू शकले असते. अनुवाद करण्यात त्यांना कमीपणाही वाटला नसता है रेग्यांना ओळखणाऱ्या मंडळींना सांगावयाची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की, प्रा. मॅकिन्टायर यांचे पुस्तक केवळ निमित्तमात्र होते.