संघर्षाची मशाल हाती ( कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या झुंजार नेत्याची कहाणी )
गिरणी कामगार वडील आणि विडी कामगार आईचा मी मुलगा. तरुणपणी वडिलांचं बोट धरून मार्क्सवादी चळवळीत आलो. विडी कामगार, यंत्रमाग कामगार आणि तमाम संघटित-असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर एल्गार पुकारला. रस्त्यावरची लढाई लढलो, खटले अंगावर घेतले. जेलवाऱ्या घडल्या, पण मागे हटलो नाही. हजारो मोर्चे काढले, आंदोलनं केली. कामगार हिताचे निर्णय घ्यायला लावले. महापालिकेत आणि विधानसभेत सत्ताधाऱ्यांना कधी पटवून देऊन, तर कधी धारेवर धरून कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या प्रश्नांसाठी झुंजत असतानाच त्यांच्या डोक्यावर हक्काचं छत असावं, याचं भव्य स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं. तब्बल चाळीस हजार श्रमिकांना स्वतःच्या मालकीची घरं उभी करून दिली. कष्टकऱ्यांचं जिणं सुखकर व्हावं यासाठी हयातभर झिजलो, याचं समाधान माझ्या मनात भरून आहे.
- नरसय्या आडम