समकालीन मराठी कवितेत अभिराम अंतरकर यांच्या ‘सांजसंकेत’ या नव्या कवितासंग्रहातील कवीच्या हृदगताचा आविष्कार आपल्या वैशिट्यपूर्ण आशय-अभिव्यक्तीमुळे दखलपात्र झाला आहे. यातील काव्यभाषा व्यक्तीची जाणीव,नेणीव व सामूहिक नेणीव अशा वेगवेगळ्या स्तरांना स्पर्श करते. आत्मनिष्ठा, उत्स्फूर्तता, उत्कटता, तीव्रता संवेदनक्षमता, संयतता आणि अलिप्तता या काव्यगुणांमुळे अभिराम अंतरकरांच्या कवितांनी आपली मुद्रा मराठी कवितेच्या नकाशावर आत्मविश्वासाने उमटवली आहे.
आशा- निराशेचे हे अनुभव आणि संवेद्यता रोमॅंटिक परंपरेतील आहेत. पण हा कृतक रोमँटिसिझम नव्हे. कवीची ती प्रकृती आहे, हे ‘सांजसंकेत’ मधील बहुतांश कविता दर्शवतात. हे सांजसंकेत सांकेतिक मात्र नाहीत. जीवनाच्या वस्तुगत अंगापेक्षा वेगळ्या अंगाची मांडणी कवी करू इच्छितो. हे आत्मगत अंग आविष्कृत करत असताना जी शब्दकळा कवी उपयोगात आणतो, ती त्याचा भाषिक समजदारपणा दाखवून देते. आपली कविता केवळ शब्दांच्या वाच्यार्थक भूलभूलैयात हरवू नये याचे सूक्ष्म भान त्याला आहे. बोरकर, ग्रेस, आरती प्रभू यांचा गोत्रप्रभाव या कवीवर दिसून येत असला तरी, त्याचे अनुकरण करणे तो कटाक्षाने टाळतो. आपली स्वतःची वाट त्याला शोधायची आहे