दीर्घकाळ चालणाऱ्या वैद्यकीय उपचारात रुग्ण आणि त्यांचे स्नेही अशा दोघांचाही कस लागतो. रुग्णांची देखभाल करीत असताना स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणे सोबत्यांसाठी आव्हान असते. त्याविषयी चर्चा करताना हे पुस्तक दीर्घकालीन उपचारात आवश्यक असलेले आर्थिक नियोजन तसेच डॉक्टर, रुग्ण व सोबती यांच्यातील सुसंवाद आणि समन्वय इत्यादी मूलभूत विषयांना हात घालते. आपल्या देशाचा विचार करता गरजू लोकांसाठी सेवाभावी आरोग्य सेवकांची फळी उभारण्याची गरज यात अधोरेखित केली आहे.
डॉ. तुषार दिघे, किडनी विकार,
डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट विशेषज्ञ
कॅन्सरसारख्या दुर्धर रोगात सोबत्यांची भूमिका महत्त्वाची असते. रुग्णांना शारीरिक वेदना होत असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मानसिक वेदना सहन कराव्या लागतात आणि त्या मोजण्यासाठी कुठलेही उपकरण नाही! रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि विशेषतः सोबती यांच्यावर होणाऱ्या मानसिक परिणामांचे या पुस्तकात केलेले विश्लेषण आणि दिलेला सल्ला त्या सगळ्यांना एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत प्रतिकूल परिस्थितीला जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करेल. प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे पुस्तक.
डॉ. मदन कापरे, माजी अध्यक्ष,
फाऊंडेशन फॉर हेड अँड नेक ऑन्कॉलॉजी – इंडिया