“सीताबाईचे वय ऐंशीच्या आसपास पोहचले होते. डोक्याचे सारे केस, पापण्या, भुवया सारे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या आणि हसली की राहिलेले उरलेसुरलेले निळसर पिवळे दात दिसत. ओठावर स्पष्ट जाणवण्याइतपत केस होते. तेही पांढरे झाले होते. केवढे प्रदीर्घ आयुष्य पाहिले, सोसले या स्त्रीने! दादासाहेबांच्या मनात आले, अगदी तरुण वयात ही विधवा झाली. पुढे सारे आयुष्य तिने असे एकाकी काढले. जवळचे कोणी राहिले नाही तरी ती राहिली. कुळीसाठी गंधर्व लावला नाही. नात्यातल्या साऱ्या मुलांना भाकरी बडवून घातल्या. हिने आयुष्याकडे काय मागितले असेल? कोणत्या आकांक्षा बाळगल्या असतील? कोणते श्रेय तिला मिळाले?”
ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीमध्ये जेमतेम चार ते पाच ठिकाणी सीताआजी या पात्राचा उल्लेख येतो. या एका पात्रातून पठारे यांनी मराठा समाजाच्या एका धगधगत्या आणि तितक्याच दुर्लक्षिलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कुळीच्या सन्मानासाठी सीताआजी बालविधवा असून गंधर्व लावत नाही. महात्मा जोतीबा फुले यांनी बालविधवांचा प्रश्न समोर आणून त्यासंबंधी समाजजागरण केल्यानंतरचा साधारण शंभर वर्षानंतरचा काळ, तरीही स्वतःला कुलीन समजल्या जाणाऱ्या मराठ्यांमध्ये हे महात्मा फुलेंचं कार्य पोहचलेलं दिसत नाही किंवा ते इतक्या गांभीर्यानं कुणी हाताळलेलंही दिसत नाही!
~ डॉ. संध्या शेलार
(अक्षरनामाच्या ‘‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया’ या लेखातून साभार)