आदित्य दवणे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. कविता या रूपबंधाशी खेळण्याची त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे आणि तो खेळ ते प्रयत्नपूर्वक खेळताहेत. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही दर्शन घडवतो. काही कविता विधानात्मक,किंचित गद्यप्रय झाल्यासारख्या वाटतात; पण त्यांना आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून तर कधी उपरोधाचा सूर लावून ते कळकळीनं सांगत राहतात – माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. कवीची श्रद्धा आहे त्याच्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ ते नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतात.
- नीरजा