इतिहास हा घडून गेलेल्या घटनांच्या बाबतीत असतो. आपल्या इच्छेनुसार त्या घटनेमध्ये बदल घडवून आणता येत नाही. समकालीन संदर्भात लोक आपापल्या सोयीने घटनांचा अर्थ लावू शकतात. मात्र आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा कोणत्याही कारणासाठी इतिहासाचा सोयीस्कर वापर आपण टाळला पाहिजे. इतिहासामध्ये लढाया, संघर्ष, शोषण आहे तसाच प्रेम, सहजीवन, आपुलकी यांनी घडलेला समाजदेखील आहे. किंबहुना युद्धापेक्षा प्रेमानेच जग बदलते हा अनुभव वारंवार आलेला आहे. त्यामुळे इतिहासाकडे आजचे वर्तमान सुंदर करण्यासाठी धडा म्हणून पाहायचे की इतिहासाची मढी उकरत राहायचे या प्रश्नाचा विचार आजच्या तरुणाईला करावा लागणार आहे. असे म्हणतात की चांगले पुस्तक ते की जे वाचल्याने एखाद्या विशिष्ट समूहाबद्दल किंवा गोष्टीबद्दल आपल्या मनात द्वेष तयार होत नाही, उलट आधीच्या चुकांमधून शिकण्याचे भान येते. हेच समकालीन दृष्टीबाबत लागू होते.
स्वातंत्र्य मिळवणे ही इतिहासाच्या एका टप्प्यावर घडून आलेली घटना असते पण ते स्वातंत्र्य टिकवणे हे पिढ्यानपिढ्याचे आव्हान असते.
( मराठवाडा १९४८ : मुक्तिसंग्रामाचा समकालीन शोध- कौस्तुभ दिवेगावकर )