ऑस्ट्रेलियातून तासाभरापूर्वी मुंबईत लँड झालेल्या ग्रेगने ‘सुनो भय्या’ म्हणत माझ्या टॅक्सीवाल्याचा ताबा घेतला. ‘वहाँ से राइट मारना, फिर लेफ्ट लेना’ करत त्याने आमची टॅक्सी रस्त्याला लावली. ‘उधर ट्रॅफिक बहोत होगा, वहाँ घुसना मत’ अशा सूचना देत शॉर्टकट समजावले. शेवटी ‘… बाकी सब ठीक ?’ म्हणत टॅक्सीवाल्या भय्याची, त्याच्या घरवालीची पोराबाळांची चौकशी केली आणि ‘जय रामजीकी’ म्हणून फोन बंद केला. हा सारा संवाद मी स्पीकर फोनमधून ऐकत होते. आपण आत्ताच एका गोऱ्या फॉरिनर लेखकाशी बोललो; वो एक बहोत बडा इंटरनॅशनल आदमी है हे त्या भय्याला पटता पटेना. … मी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सला भेटायला निघाले होते; तर आधी लीनबाबाच भेटला. प्रभाकरचा लीनबाबा. रुख्माबाईचा शांताराम. ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स. वाटच पाहात होता. मला म्हणाला, “तुझ्या बॅगमध्ये आहे काय इतर्क?” मी म्हटलं, “मराठी ‘शांताराम’ची काही प्रकरणं.” लहान मुलाच्या अधीर उत्सुकतेने डोळे बारीक करत म्हणाला, “वाचतेस प्लीज?” सुरुवात केली तर समोरच्या चमकत्या नजरेत एकदम पाणी भरलं. थोड्या वेळाने मला म्हणाला, “थांब… थांब… थांब… कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?”
म्हटलं, “प्लीज डू.” “लीनबाबा अॅण्ड प्रभाकर… हाऊ डू दे कॉल इच अदर?” “म्हणजे?” “म्हणजे…? यू नो, इन मराठी… प्रभाकर लीनला हाक कशी मारतो?” “दे आर फ्रेण्ड्स, ग्रेग-” मी न राहवून त्याला अर्ध्यावर तोडलं, “प्रभाकर इव्हन कॉल्स हिम हरामखोर… अॅण्ड रांडेच्या… अॅण्ड भोसडीच्या – या शब्दांच्या उच्चारासरशी, ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स नावाचा तो जगप्रसिद्ध सेलिब्रिटी लेखक बसल्याजागी स्प्रिंगसारखा उसळला… आणि पुढच्या क्षणी अत्यानंदाने वेडावल्यासारखा नाचत सुटला. एकमेकांना कचकचीत शिव्या घालूनच हाकारणाऱ्या अस्सल बम्बैय्या दोस्तान्याची ‘नस’ (हा ‘त्याचाच’ शब्द) अचूक ओळखणारा अनुवादक ‘शांताराम’ ला भेटल्याचा हा आनंद होता; हे नंतर कळलं. “जगातल्या अडतीस भाषांमध्ये ‘शांताराम’चा अनुवाद झालाय. त्यातल्या काही भाषा मला तोडक्या मोडक्या का असेना; पण येतात. त्यांपैकी एकाही अनुवादकाला ही गंमत कळलेली नाही. तूच पहिली.”
……
ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथे जन्म. युवक चळवळीने भारलेले आणि कवितांनी बहरलेले तारुण्याचे दिवस प्रेमात बुडाले आणि या कलंदर माणसाच्या जगण्याची दिशाच बदलली. लग्न झालं. ते टिकलं नाही. घटस्फोटानं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, लहानग्या मुलीची ‘कस्टडी’ मिळाली नाही या दुःखानं पुरतं बिथरलं. ग्रेगरी हेरॉईनच्या जाळ्यात ओढला गेला. मग न परवडणाऱ्या व्यसनाचा खर्च भागवण्यासाठी खोट्या पिस्तुलानं लोकांना धमकावणं, वाटमारी सुरू झाली. अशाच एक गुन्ह्यासाठी पकडला गेलेला ग्रेग एकोणीस वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊन तुरुंगाच्या अंधारकोठडीत फेकला गेला. अर्धं आयुष्य असं अंधारात काढणं असह्य होऊन, एका सकाळी ग्रेगनं ऑस्ट्रेलियातल्या ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’ची भित ओलांडली आणि तो फरार झाला. तो फरार… आणि त्याचं आयुष्य परागंदा ! त्यानंतर खोटी कागदपत्रं, नकली पासपोर्टच्या आधारानं तो जगभर वणवणत भटकला -न्यूझीलंड, आशिया, आफ्रिका आणि यरोप. ही त्याचीच कहाणी!
…………….
जगभरातल्या 38 हून अधिक भाषांमध्ये 50 लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा गाठणारी ‘बेस्ट सेलर’ कादंबरी!